नेशन न्यूजमराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतीपिकांची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी शेतीला कुंपन करून द्यावे, चालू वर्षीची अग्रीम पीकविम्याची रक्कम तातडीने द्यावी, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर व नांदुरा तालुक्यात महापूरामुळे झालेल्या नुकसानीची 100% नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. मागील वर्षीच्या सततच्या पावसाची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी आणि कृषीपंपासाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
या डफडे बजाओ आंदोलनामध्ये असंख्य शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास स्वाभिमानीकडून राज्यभर आंदोलनं करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.