नेशन न्यूज मराठी टीम.
शहापूर/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या शहापूर उपविभागात वीजचोरी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात २५ लाख रुपये किंमतीची २ लाख ३ हजार ५०० युनीट विजेची चोरी पकडण्यात आली. तर ६४ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ प्रमाणे मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर उपविभागात शहापूर, आसनगाव, शिऱ्याचा पाडा, आवरे, वासिंद, पेडरघोळ, कसारा, धसई, पाली व शिलोत्तर या भागात विशेष पथकांच्या माध्यमातून वीजचोरी शोध मोहीम राबवण्यात आली. मीटरकडे येणाऱ्या केबलला जॉईंट करून मीटर टाळून परस्पर वीजवापर, मीटरमध्ये फेरफार करून २५ लाख रुपयांपेक्षा अधीकची वीजचोरी होत असल्याचे शोध मोहिमेत आढळून आले. वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. परंतू मुदतीत या रकमेचा भरणा न करणाऱ्या ६४ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात ६४ जणांविरुद्ध वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.