प्रतिनिधी:- देशातच नव्हे तर जगात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक देश कोरोनाला रोखण्यासाठी त्याचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे आणि त्या कामी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, प्रशासनाला सहकार्य करायचे. त्यामुळे येणारे सण, उत्सव यंदा सार्वजनिक स्तरावर साजरे न करता आपल्या घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. त्यामुळे यंदाची महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्तरित्या घरातच साजरी करण्याचे आवाहन बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असून त्यासाठी ही जयंती भव्यदिव्य साजरी न करता एकजुटीने ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संकल्पना बाळासाहेबांची असून त्याची सुरुवात 10 एप्रिल पासून प्रबुद्ध भारतच्या पेजवर करण्यात आली आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात अनेक कलाकार, शाहीर, साहित्यिक, लोकगायक, वक्ते सहभागी झाले असून स्वतः बाळासाहेब 14 एप्रिल रोजी लोकांना उद्देशून संबोधन करणार आहेत.
‘उत्सव बहुजन नायकांचा, ज्योतिबा भीमरावांचा’ या ऑनलाईन जयंती उत्सवाची सुरुवात 10 एप्रिल रोजी ‘प्रबुद्ध भारत’च्या पेजवर सुरू करण्यात आली असून 10 एप्रिल रोजी महिला आघाडी पदाधिकारी
शमीभा तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी नेते चेतन गांगुर्डे यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरवात झाली आहे. त्यानंतर हर्षदा डोंगरे, विर भागवत, संविधान गांगुर्डे यांनी यात सहभाग घेतला. तर जयंती घरी कशी साजरी करावी, यावर भीमराव आंबेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रदेश प्रवक्ता गोविंद दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी समकालीन- सामाजिक राजकीय वास्तव आणि आंबेडकरी युवकांची भूमिका मांडली.
12 एप्रिल रोजी प्राध्यापक हमराज उईके यांनी संविधानिक समाज आणि वंचित बहुजन आघाडी यावर आपले मत मांडले. संतोष संखद या कला दिग्दर्शकाने ‘कलाक्षेत्रातील संधी’यावर आपले मत मांडले. गायक उत्कर्ष आनंद शिंदे यांनी आपली कला सादर केली. शाहीर रोहित जगताप यांनी आपल्या शाहिरीने या कार्यक्रमाची रंगत वाढवली.
13 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय अर्थात अकोला पॅटर्न ची माहिती दिली. रात्री नऊ वाजता प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद यांनी ‘बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मिती’वर प्रकाश टाकला. तर गायक मधुर शिंदे यांनी ही या कार्यक्रमात भाग घेतला. वंचितच्या प्रदेश प्रवक्ता दिशा पिंकी शेख यांनी लैंगिक अल्पसंख्यांक समूहांचे अधिकार आणि भारतीय संविधान यावर आपले विचार मांडले.
14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी 9 वाजता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आपले मत मांडणार आहेत. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शाहीर मेघानंद जाधव,दुपारी 12 वाजता लोक गायिका कडूबाई खरात, दुपारी 3 वाजता रॅपर विपीन तातड आणि टीम सायंकाळी 5 वाजता सूर नवा ध्यास नवा फेम अमोल घोडके, सायंकाळी 6 वाजता ‘भीमराव जबरदस्त’ फेम राहुल साठे तर सायंकाळी साडे सात वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ स्टार प्रवाह फेम विनल देशमुख तसेच रात्री 9 वाजता ‘मी वादळवरा’ फेम अनिरुद्ध विणकर यांचे कार्यक्रम होणार आहे.
सर्वांनी या जयंतीच्या कार्यक्रमात भाग घेऊन देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी यंदाची जयंती घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जयंतीनिमित्त जमा झालेला निधी गरिबांना द्यावा. जेणे करून हातावर पोट असलेल्या लोकांची चुल पेटती राहिली पाहिजे. हाच संदेश महात्मा जोतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांनी दिला आहे. या उपक्रमास मोठ्याप्रमाणात ऑनलाइन प्रतिसाद मिळत असून यातून प्रेरणा घेऊन अनेक फेसबुक पेजेस आणि संघटनांनी जयंती ऑनलाईन साजरी करण्यात पुढाकार घेतला आहे.
- April 13, 2020