प्रतिनिधी.
भंडारा – कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये शिथीलता दिल्यामुळे भंडारा शहरातील नागरिक जीवनावश्यक तसेच घरगुती वस्तु आणण्यासाठी घराबाहेर पडत असून गर्दी वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत नागरिकांना मार्गदर्शन व कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु यांचे उपस्थितीत रुटमार्चचे आयोजन करण्यात आले. सदर रुटमार्च मध्ये पोलीस स्टेशन भंडारा येथील 28 कर्मचारी, आरसीपीचे 25 कर्मचारी, वानिशाचे 5 कर्मचारी, 5 होमगार्ड व नगरपरिषद भंडारा येथील 25 कर्मचारी असे एकूण 87 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रुटमार्च पोलीस स्टेशन भंडारा यैथून निघून त्यानंतर मेन रोड मार्गे पोस्ट ऑफिस चौक, त्रिमुर्ती चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, कुकडे नर्सिग होम, पांडे महाल ते गांधी चौक परत पोलीस स्टेशन भंडारा असा काढण्यात आला. या रुटमार्च दरम्यान शहरातील नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्यास घराबाहेर निघण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.