महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी थोडक्यात

काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मावळली. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. यानंतर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालावली असून, राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधून घेण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाने राजकारण दूषित झाले आहे. परंतु काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन.पाटील यांची राज्यात ओळख आहे. 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून ते 2004 आणि 2019 असे 2 टर्म आमदार झाले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.

आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 सालचा. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रहिवाशी. पी. एन. पाटील हे पहिल्यांदा 2004 मध्ये सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी 2009 व 2014 मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली. मात्र, या दोन्हीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून 2009 व 2014 च्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. 1999 पासून ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते. या शिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील पी. एन. पाटील यांनी आपले पाय घट्ट रोवले असून, जिल्हा बँकेत ते 35 वर्षाहून अधिककाळ संचालक म्हणून राहिले आहेत. तर 1999 पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्ष ही होते. तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यासोबत 25 वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं.

आमदार पी. एन. पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढ-उतार, बंडखोरी पाहिली मात्र त्यांनी कधीही वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही. आमदार पी. एन. पाटील माझी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. यामुळे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच रहाणे पसंत केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रति असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. तर या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी खास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी कोल्हापुरात आल्या होत्या. तसेच पी. एन. पाटील यांनी दिंडनेर्ली येथे सूतगिरणीची उभारणी करत त्याला राजीव गांधी यांचे नाव दिले. तसेच अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. दरवर्षी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पी. एन. पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी कोल्हापूर ते दिंडनेर्ली सद्‌भावना दौड काढण्यात येते. या कार्यक्रमासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते हजेरी लावत असतात. तर राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी. एन. पाटील यांचे घनिष्ट संबंध होते. विधानसभा निवडणुकीतील पी. एन. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ विलासराव देशमुखच करायचे. आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबरच श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्षपद आहे. त्यांच्या कन्या सौ.टिना या कराडमध्ये स्थायिक आहेत.आज पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे करवीर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Translate »
×