कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी येथे लसीकरण केंद्र सुरु ठेवले होते. त्याठिकाणी 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लसीकरण केले जाईल. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणा:याना लस दिली जाईल असे आवाहन महापालिकेने केले होते. तरी देखील लसीकरण केंद्रावर आज गोंधळ उडाला.
लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जवळपास 200 जणांनी केले होते. त्यापैकी लस घेण्यासाठी केवळ आठ जण केंद्रावर पोहचले होते. मात्र ज्या नागरीकांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते. ते देखील लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहचले. त्यांनी पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांग लावली होती. सकाळी आठ वाजताच्या सुमारास भली मोठी रांग पाहून व्यवस्थापनाने त्यांना टोकन दिले होते. त्यांनी टोकन घेऊन रांगेत उभे राहणो पसंत केले. मात्र दुपारी एक वाजताच्या दरम्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले की, केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेश करणा:यांनाच लस दिली जाईल. तेव्हा टोकन घेऊन रांगेत उभे असलेल्या नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लस द्यायचीच नव्हती तर टोकन देऊन रांगेत कशाला उभे केले असा संतप्त सवाल रांगेत उभे असलेल्या मयूर महाजन या तरुणाने केला. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणारे रजिस्ट्रेशन करुन लस घेण्यासाठी येणार नसतील तर ज्यांना टोकन देऊन रांगेत उभे केले आहे. त्यांना लस दिली जावी अशी मागणी नागरीकांनी केली. मात्र प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य केली नाही. महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निबांळकर यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. निबांळकर यांनी सांगितले की, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 200 जणांनी केले होते. 200 डोस केंद्रासाठी उपलब्ध झाले होते. गर्दी भरपूर झाल्याने रांगेत उभे असलेल्यांना टोकन दिले गेले. तर उपायुक्त यांनी लसीकरणाचे काम करणा:या एजेन्सीची चूक असल्याचे नमूद केले.
- May 1, 2021