नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – शहरासह ग्रामीण भागात रोटरी क्लबचे जोरदार सामाजिक कार्य सुरु असून आतापर्यंत दुर्गम भागात रोटरीने असंख्य गावांत पाचशेच्यावर ‘चेक डॅम’ बांधून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोटरी क्लब तर्फे आरसीसी प्रकल्पांतर्गत ग्रामीण शेती, जमीनीचे संवर्धन तसेच पर्यावरण या विषयांवर कल्याणच्या बालक मंदिर शाळेत रविवारी ११ वाजता एक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिलजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये काम करणारी रोटरी ग्रामीण भागातही आपला ठसा उमटवत असते. ११७ वर्ष जुन्या अशा रोटरी इंटरनॅशनल तर्फे ठाणे जिल्ह्यात आणि परिसरात सुमारे ११० क्लब लहान मोठे उपक्रम राबवत असतात. काही काही प्रकल्प तर परदेशातील रोटरी क्लब बरोबर संयुक्तपणे राबवले जात असतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा मोखाडा अशा दुर्गम भागात रोटरीने आतापर्यंत ५०० च्यावर चेक डॅम बांधून असंख्य गावांत लक्षणीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे भूजल पातळी तर वाढलीच परंतु उन्हाळ्यात पाण्याअभावी होणारे स्थलांतरही थांबले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी मनीषा कोंडुसकर, माधवी डोळे, शिरीष केळकर, जितेंद्र नेमाडे, केलास देशपांडे, निखिल बुधकर, नितीन मचकर आदी उपस्थित होते. या परिषदेत मृदा संवर्धन, पशु संवर्धन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरासह ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कचऱ्याचे व्यवस्थापन करत त्याचा खातात रूपांतर कसे करता येईल याबाबत ड्राय वेस्ट या विषयावर निसर्ग फाऊंडेशनचे डॉ. केळशिकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पशु संवर्धन या विषयावर डॉ. लक्ष्मण पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गावातील जनावरांसाठी वाक्सीनेशन कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकेल याकडे देखील लक्ष देणार असल्याचे मनीषा कोंडुसकर यांनी यावेळी सागितले. मृदा संवर्धनासह शेतकऱ्यांना एका एकरातून ४ पिके कशी घेता येतील, मृदेची धूप कशी रोखता येईल अशा विविध मुद्द्यांवर इशा फौंडेशन तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
रोटरीच्या या कामांअंतर्गतच रोटरी कम्युनिटी कोर ही संकल्पना गेल्या अनेक वर्ष राबवली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांचे आरसीसी मंडळ स्थापन केले जाते आणि त्या अंतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात. रोटरीचे प्रांतपाल कैलास जेठानी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असतील.