नेशन न्यूज मराठी टीम.
गोवा/प्रतिनिधी – पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथील डॉन बॉस्को महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक गौतम एस. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा माध्यम साक्षरता वाढवून चुकीच्या (दिशाभूल करणाऱ्या) माहितीचा प्रतिकार करण्यासंदर्भात होती. पत्रकारितेचे (मास कम्युनिकेशन) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात सध्याच्या संचारयुगात चुकीची माहिती ओळखणे, विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना माध्यम साक्षरतेच्या संकल्पनेची ओळख करून देणे आणि खोट्या बातम्या आणि खोट्या बातम्यांमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे हा होता. सत्रादरम्यान, सहभागींनी खोट्या बातम्यांच्या (डीपफेक्स) वाढत्या धोक्याबद्दल चर्चा केली आणि भ्रामक मीडिया सामग्री ओळखण्याच्या तंत्रांसंबंधी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बनावट व्हिडिओ आणि मूळ व्हिडिओ यातील फरक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बातम्या आणि चुकीच्या माहितीवर आपला दृष्टीकोन सामायिक केला, फेक न्यूज शोधण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या. विचारांच्या या देवाणघेवाणीमुळे सारासार विचारसरणी आणि विकसित होत चाललेल्या प्रसारमाध्यमांच्या परिदृश्याचे सखोल आकलन होण्यास चालना मिळाली.
कार्यशाळेपूर्वी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांचा कार्यशाळेसाठी सक्रीय सहभाग होता. याला आणखी चालना देण्यासाठी पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारच्या आणखी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.