नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अखिल विश्वाला मानवतेचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सवाला त्यांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी मध्ये आज पासून सुरुवात झाली आहे. पहाटे साडेचार वाजता पासून तीर्थस्थापनेने या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला असून येत्या दोन नोव्हेंबरला तुकडोजी महाराजांना देशभरातून आलेले लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली वाहणार आहे.
मौन श्रद्धांजलीनंतर या ठिकाणी सर्व धर्माच्या प्रार्थना देखील केल्या जाणार. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने त्यांच्या महासमाधीला रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी सामुदायिक ध्यानानंतर श्री गुरुदेव मानव सेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराजांची भव्य शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत दिंडी, पताका ढोल याचा समावेश होता. सात दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसांमध्ये लाखो गुरुदेव भक्त तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होणार आहे.