महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र मुख्य बातम्या

डोंगर उतारांवरील गावे व वस्त्यातील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतरास सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री यांचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.  पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी तसेच समन्वयाने यंत्रणांनी काम करावे, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुसळधार पाऊस पडल्यामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे. कोयनेतून विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. पूरग्रस्त नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे तसेच अडकलेल्याना अन्नाची पाकिटे, कपडे, औषधी आदि त्वरित मिळतील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यात ही आपत्ती आल्याने कोविड रुग्णांची असुविधा होऊ देऊ नका असे सांगून ते म्हणाले की, आरोग्याचे नियम पाळून, विशेषत: मास्क घालून बचाव कार्यातील लोकांनी काळजी घ्यावी.

यावेळी बैठकीत एकूण एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याविषयी माहिती देण्यात आली. एनडीआरएफच्या एकूण १४  तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहोचल्या असून त्यांची जिल्हानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे : पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १, कोल्हापूर २,

एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची १ टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे.

तटरक्षक दलाच्या २ , नौदलाच्या २  तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत.

राखीव तुकड्या अंधेरी येथे – २, नागपूर येथे १, पुणे येथे १, एसडीआरएफ धुळे येथे १, आणि नागपूर येथे १ अशा तैनात करण्यात आल्या आहेत.

आज दुपारपर्यंत एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून येत आहेत.

आज सकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार बचाव कार्याद्वारे चिपळूण येथून ५००  लोकांना वाचविण्यात आले.

चिपळूण येथे ४ निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

कोल्हापूर – पन्हाळा रोड येथे पूराच्या पाण्यात बसमध्ये अडकलेल्या २२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

महाड येथे हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने केलेल्या हवाई पाहणीनुसार पाणी पातळी कमी होताना दिसते.

खेड जि. रत्नागिरी या ठिकाणी भूस्खलनामूळे ७ -८ कुटूंबे बाधित झाली आहेत. या  घटनेत १० व्यक्ती जखमी झाल्या असून १०  ते १५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या मदतीने शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

वशिष्टी नदी वरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे.

महाड माणगांव येथे 2000 लोकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांना अन्न व कपडे गरजेनुसार पुरविण्यात येत आहेत.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, पोलिस महासंचालक संजय पांडे प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर,  प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असिम गुप्ता  आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×