नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – गणेश विसर्जन सर्वत्र उत्साहात पार पाडले आहे. ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव आणि निर्माल्य कलश उभारले होते. काही ठिकाणी नदीत , तर काही ठिकाणी समुद्रात मोठ्या उंचीच्या मुर्त्या विसर्जित केल्या गेल्या. परंतु विसर्जनानंतर समुद्र किनारी बराच कचरा गोळा होतो. साफसफाई मोहीम करण्याची नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. याचे भान असलेले एनसीसी चे कॅडेट्स हा कचरा वेचून चौपाटी साफ करण्यासाठी पुढे येताना मुंबईत दिसून आले.
पुनीत सागर अभियानाचा एक भाग म्हणून, एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाच्या सुमारे 500 कॅडेट्सनी गिरगाव चौपाटी, मुंबई येथे गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारी स्वच्छता कार्यक्रम हाती घेतला. गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्थानिक लोकांमध्ये तसेच पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि गणेश विसर्जन सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतून हजारो लोक समुद्रात गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येतात. नागरी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांसह एनसीसी कॅडेट्सचा प्रयत्न हा समुद्रकिनाऱ्याची लवकरात लवकर साफसफाई करून तो पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचा होता.
दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाराष्ट्र संचालनालयाचे एनसीसी कॅडेट्स गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा तसेच जुहू समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी योगदान देतात. ‘स्वच्छता ही सेवा’ या मंत्रासह पुनीत सागर अभियान उपक्रमाचा एक भाग म्हणून, एनसीसी कॅडेट्स आणि कर्मचारी आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे आणि ते स्वच्छ ठेवण्याचे उदात्त कारण अधोरेखित करतात आणि त्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य करतात.