नाशिक/प्रतिनिधी – दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा बसत असल्याने पाणीटंचाईची दाहकता देखील वाढताना दिसून येत आहे. तळपत्या गरमीत विहिरी आटल्या, नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळणे देखील काठी झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली आहे. अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. जानेवारी महिन्यापासून वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती सरिता कऱ्हाडे यांनी दिली आहे.
हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना १ ते २ किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. जवळपास 58 गावे व वाड्या वस्त्यांवर 57 टॅंकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे. प्राशसनाने पाण्याची समस्या संपत नाही तोवर पाण्याचे टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.