नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या अनेक टोळ्या अग्रेसर आहेत. त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या कि बंद घरावर पाळत ठेऊन घरफोड्या केल्याच्या रोज नवीन घटना समोर येतात. अशा घटनांमध्ये अनेक लोकांची आयुष्यभर साठवलेली कमाई चोरीला जाते. छत्रपती सांभाजीनगर मधील सिडको पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणात जेरबंद झालेला आरोपी घरफोडी करायचा तसेच विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांचे महागडे साहित्य चोरायचा. पोलिसांनी आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेखर शिवानंद जैसवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बंद असलेल्या घरात घरफोडी करत असे. तसेच शिक्षणासाठी बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांच्या महागड्या वस्तु आणि मोबाईल चोरायचा.
सिडको पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यात मोबाईल, स्मार्ट वॉच, लॅपटॉप, कॅमेरा, दुचाकी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे. ही कामगिरी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, लाला पठाण, बाळासाहेब जगताप, विशाल सोनवणे, पंकज पाटील, सहदेव साबळे यांनी पार पाडली. आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली आहे.