पंढरपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्या-वस्त्यावर कोरोनाने थैमान घातले असताना पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत कोरोनाला गावच्या वेशीवर रोखुन धरले आहे.गावकऱ्यांच्या एकीमुळे हे शक्य झाले असल्याचे गावातील नागरिक मोहन अनपट सांगत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार चिंचणी या गावात गेल्या सव्वा वर्षात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भात असलेले नियम पाळल्याने चिंचणी गाव कोरोना मुक्त राहिले आहे.गावात मास्क,सॅनिटाझर,आरोग्याची वेळेत तपासणी याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावची लोकसंख्या जेमतेम सुमारे एक हजाराच्या आसपास असून कोरोनापासून बचावासाठी गावात वावरत असताना लोक योग्य अंतर ठेवतात.गावाने गेल्या वीस वर्षांत सात हजाराच्या वरती झाडे लावली असून झाडांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे.त्यामुळे गावचा परिसर हिरवळीने नटलेला आहे.एकीकडे ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्ण दगावत असताना गावातील झाडापासून मिळणाऱ्या मुबलक ऑक्सिजन मुळे कोरोना आमच्या गावात पोहचू शकला नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर चिंचणी गावातही दहशत पसरली होती.गावातील नागरिकांनी एकी दाखवत कोरोनाला गावापासून दूर ठेवण्यासाठी गावात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमावर सुरुवातीपासून ते आजपर्यंत बंदी घातली आहे.किंबहुना लोक स्वतःहुन नियमांचे पालन करीत आहेत.गावात सर्दी खोकल्याची लक्षणे आढळणाऱ्या लोकांचे विलगिकरण करून उपचार केले जात आहेत.सुदैवाने आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही.गावात नागरिकांच्या आरोग्याची नित्य तपासणी सुरू असून गावातून दररोज बाहेर-जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची विशेष नोंद ठेवली जात आहे.सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन ची अमलबजावणी सुरू असताना या गावातील शेतीसह अनेक छोटे-मोठे उद्योग सुरळीत सुरू आहेत.लॉकडाऊन,टाळेबंदी केले असतानाही अनेक गाव-शहरात कोरोनाने शिरकाव करून हाहाकार माजवला असताना चिंचणीच्या नागरिकांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेर थोपवून ठेवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- May 12, 2021