नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिल्याने आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला आहे. तब्बल ७ वर्षांनी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती होत असल्याने बैलगाडा शर्यती प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशाच बैलगाडा शर्यत प्रेमी असलेल्या कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, अन्नपूर्णा नगर येथील छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने गणेशोत्सवात बैलगाडा शर्यतीचा देखावा साकारला आहे.
राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी जोर धरली होती. भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होत होती. अखेर मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्या नंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी या शर्यतींचे आयोजन करण्यात येते.
ग्रामीण भागासह शहरी भागात देखील या बैलगाडा शर्यतींचे चाहते असून शहरातील नागरिकांना आणि नवीन पिढीला या बैलगाडा शर्यतींची माहिती व्हावी यासाठी त्यांची माहिती दर्शविणारा देखावा छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर अंकुश यांनी दिली.