नेशन न्युज मराठी टीम.
चाळीसगाव/प्रतिनिधी– वयोवृद्ध, विधवा, दिव्यांगांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य सरकारने ”आपली पेंशन आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत घरपोच विशेष अर्थसहाय्याची वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ आज तालुक्यातील चैतन्य तांडा येथून तहसीलदार अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र त्यांना दर महिन्याला पेंशन घेण्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. हे लक्षात घेऊन राज्य सरकाने ”आपली पेंशन आपल्या दारी’ या योजनेला सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात १ जुलै, २०२२ पासून विशेष सहाय्य योजनेच्या शंभर टक्के लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार सदर अभियानाचा शुभारंभ तालुक्यातील चैतन्य तांडा व भोरस गावातून तहसीलदार अमोल मोरे यांच्या हस्ते बुधवार रोजीपासून करण्यात आले आहे. सदर योजना यशस्वी राबविण्यासाठी तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहे.
याप्रसंगी नायब तहसीलदार धनंजय देशपांडे, कारकून संजय पाटील, पोस्टमन पंकज पाटील, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, तलाठी मोहीम, सदस्य राजेंद्र चव्हाण, भाऊलाल चव्हाण, उदल पवार, ग्रामस्थ कोंडू राठोड, भावलाल राठोड, रघुनाथ राठोड, जालम पितांबर, जालम राठोड यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.