नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
आसाम/प्रतिनिधी – ईशान्येकडील राज्यांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग उपक्रमांसारख्या विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला गती आणि प्रोत्साहन देण्यासाठी आसाम आणि त्रिपुराच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर असलेले खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आसाममधील कुमारीकाटा इथल्या तामुलपूर अंचलिक ग्रामदान संघाच्या खादी ग्रामोद्योग विद्यालयाला 12 जानेवारी 2023 रोजी भेट दिली. त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या 26 विणकाम आणि सूतकताई प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. हे प्रशिक्षणार्थी एकेकाळी, दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA), युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी (UPLA) या अतिरेकी संघटनांचे युद्धविरामानंतर भूमीगत झालेले अतिरेकी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक कौन्सिल ऑफ कार्बी लोंगरी (PDCK) या अतिरेकी गटाचे आणि दिमा हासाओ, कार्बी आंगलोंग आणि विश्वनाथ चाराली गटांचे भूमिगत अतिरेकी होते. बोडो प्रादेशिक क्षेत्रातील या उपक्रमांची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमीत शहा यांनी मे 2022 मधील त्यांच्या भेटीदरम्यान केली होती.
आयोगाच्या अध्यक्षांनी आपल्या भेटीदरम्यान प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आसाम सरकारच्या योजने अंतर्गत स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणार्थींना या समारंभात प्रत्येकी चार लाख रुपये निधीही देण्यात आला.
आयोगाच्या अध्यक्षांनी 13 जानेवारी 2023 रोजी बारपेटा जिल्ह्यातील प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या (PMEGP) केंद्रांना देखील भेट दिली आणि उद्योजकांना त्यांचे उद्योग आधुनिक सुविधांसह उद्योगसमुहामध्ये परिवर्तित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. ईशान्य भारत स्वावलंबी व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग परिवारासाठी तेच पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे रोजगारवाढीसह पंतप्रधानांचं हे स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुक्ष्म आणि लघु उद्योगांच्या स्थापनेसाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून शक्य ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासनही आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी पुढे दिलं. त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या, गुवाहाटीतील रुपनगर इथल्या विभागीय प्रशिक्षण केंद्राला (MDTC) देखील भेट दिली.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग देशभरात खादी आणि ग्रामोद्योगाच्या योजना आणि विविध उपक्रम राबवत आहे. भारत सरकारच्या सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम असलेल्या, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा द्वारे (PMEGP), याच मंत्रालयाची महत्वाची राष्ट्रीय संस्था असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं संपूर्ण भारतभर 1 कोटी 67 लाख 60 हजार लोकांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं 2022-23 या वर्षात आतापर्यंत, 3 लाख 76 हजार 720 लोकांना रोजगार दिला आहे. यापैकी 25 हजार 824 जण ईशान्य भारतातील, तर 10 हजार 328 जण आसाममधील आहेत. आयोगानं भारतात 47 हजार 90 उद्योग निर्माण केले असून, ईशान्य भारतात त्यापैकी 3 हजार 228, तर आसाम राज्यात 1 हजार 291 उद्योग आहेत. भारत सरकारनं मार्जिन मनी ( उद्योग उभारण्यासाठी आवश्यक रकमेच्या विशिष्ट प्रमाणात कर्ज म्हणून मंजूर झालेली रक्कम सोडून उर्वरीत रक्कम) म्हणून ईशान्य भारतात 82 कोटी 47 लाख रुपये आणि आसाममध्ये 29 कोटी 71 लाख रुपये एवढा निधी पुरवला आहे.