नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे. – माणसा इथे मी तुझे गीत गावे,असे गीत गावे तुझे हीत व्हावे…”या आणि अशा अनेक गीतातून मानव कल्याणासाठी करुणा भाकणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे १५ ऑगस्ट २०२१ ते १४ ऑगस्ट २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष.वामनदादा यांनी संविधानाचे समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे, मानवतावादी आणि आंबेडकरी विचार यांचा आपल्या लेखणीतून आजन्म प्रचार आणि प्रसार केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी जाऊन निस्वार्थ भावनेने हे कार्य केले. जन समुदायात चैतन्य आणि जागरूकता निर्माण केली.पु ल कट्टा, कल्याण, ने सर्वप्रथम पुढाकार घेत, ‘ वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव स्थापन करीत, शताब्दी वर्ष साजरा करण्याचा मानस केला. वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करीत जन्मशताब्दी साजरी केली. जन्मशताब्दी वर्षाची सांगता रविवार दिनांक २१ ऑगस्ट २२ रोजी कल्याणात दिमाखदार सोहळ्याने करण्यात येणार आहे.
सांगता सोहळ्याच्या अध्यक्षपदी, ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक श्री भारत सासणे आहेत. तर क.डो.म. पालिकेचे आयुक्त श्री भाऊसाहेब दांगडे, जेष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत श्री अर्जुन डांगळे, माजी आमदार श्री नरेंद्र पवार, कवी – समीक्षक श्री निळकंठ कदम , कवी – चित्रकार अमिता कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.
या निमत्ताने, महोत्सव समिती स्वागताध्यक्ष मा. आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. वामनदादा, शांता शेळके आणि वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी निमित्त, “त्रिधारा संगम” हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. गायक गिरीश जोशी आणि सहकारी ह्या कवी त्रयीला त्यांच्या कविता गायन करून अभिवादन करणार आहेत. महोत्सव समिततर्फे वामनदादा यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेली चित्रफित “वादळवारा” प्रदर्शित करून, तिचे लोकार्पण होणार आहे.वामनदादा यांचे सहकारी आणि चाहते यांनी त्यांच्या पश्चात त्यांची गाणी, विचार यांचा प्रसार आणि प्रचार केला. त्या निवडक सहकारी यांचा “जीवनगौरव” पुरस्काराने करण्यात येणार आहे. वामनदादा यांच्या गीतांचा संग्रह करणारे, अहमदनगरचे श्री माधवराव गायकवाड, मोहने येथील जेष्ठ कवी श्री भीमराव कालेनंद तसेच गीतकार – संगीतकार आणि गायक श्री प्रभाकर पोखरीकर यांचा गौरव करण्यात येणार आहे.
कल्याण शहरातील, विविध क्षेत्रात अविरत कार्यरत संस्थांना, ‘अविरत सेवा सन्मान’ने गौरविण्यात येणार आहे.
कल्याण गायन समाज (कला क्षेत्र), कल्याण सार्वजनिक वाचनालय (वाचन संस्कृती), कल्याण महिला मंडळ (महिला जागृती), धर्मार्थ नेत्र इस्पितळ (आरोग्य), वी केअर सामाजिक संस्था (आरोग्य) आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रसंगी, साहित्य क्षेत्रातील भरीव आणि उल्लेखनीय कार्याबद्दल “प्रतिभा गौरव” पुस्काराने, कल्याणचे रंगकर्मी, कवी आणि कथाकार, केशवसुत पुरस्काराने सन्मानित रवींद्र दामोदर लाखे, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
समितीने, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, “वामनदादा कर्डक राज्यस्तरीय – महिला विशेष – काव्यसंग्रह स्पर्धा” घेतली होती. या स्पर्धसाठी आलेल्या ६९ काव्यसंग्रहातून अमरावतीच्या सारिका उबाळे-परळकर यांचा “कथार्सिस” हा संग्रहाची सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून निवडण्यात आला आहे. सारिका उबाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जेष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत श्री अर्जुन डांगळे यांचे, “वामनदादा कर्डक यांचे साहित्य आणि जीवित कार्य” यावर व्याख्यान होणार आहे.
रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी, सायंकाळी ४ वाजेपासून, ‘मराठा ज्ञाती समाज सभागृह’, आचार्य अत्रे रंगमंदिर समोर, बाजारपेठ मार्ग, कल्याण येथे संपन्न होणार आहे. कल्याण नगरीतील सर्व रसिक आणि आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते, श्रोते यांनी “वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला” आर्वजून रहावे असे आग्रहाचे निमंत्रण समिती कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत मोरे, स्वागताध्यक्ष मा. आमदार विश्वनाथ भोईर आणि पुल कट्टा अध्यक्ष महेंद्र भावसार यांनी दिले आहे.