नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगल तोंडिमूळे जंगली प्राणी हे खाण्याच्या शोधात मानवी वस्तीत वावरताना दिसत आहे. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडलेली दिसून आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात. मात्र, आता तर हद्दच झाली. एक मादा अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते. अर्थातच वर्दळ असते. आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्याकारणाने सध्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका गावकऱ्याचा मृत्यू हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे झाला होता अशी माहिती येथील गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होते.