नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – कारागृह प्रशासनाने पुढाकार घेत ध्वज दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील कारागृहात बंदिवान व त्यांच्या पाल्यांमध्ये गळाभेटीचा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित केला होता. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात देखील आईवडीलांची भेट घेण्यासाठी चिमुकल्यांनी गर्दी केली होती. चार भिंतीच्या आड गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या जीवनात सुद्धा आनंदाचे क्षण यावे याकरिता गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात गळाभेट कार्यक्रम बंद करावा लागला होता. मात्र,गेल्या वर्षी पुन्हा गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. आज शेकडो बंदीवानांना त्यांच्या लहान मुलांबाळांसह कुटुंबीयांना भेटता आले असून या भावनिक क्षणामुळे त्यांचे डोळे अधिकाऱ्यांचे डोळे देखील पाणावले होते.
कारागृहाच्या चार भिंतीआड असलेल्या निरव शांततेला चिरत आज लहान मुलांच्या गोंगाटाने वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली, हे गुन्हेगारी जग किती वाईट असते याची जाणीव सुद्धा बंदीवानांना झाली असावी. मुलाबाळांना भेटल्यानंतर बंदीवानांचे डोळे अक्षरशःपाणावले होते.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एकापेक्षा एक खुंखार बंदीवानांचा मुक्कामी आहेत. कळत-न कळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या मुलाबाळांना वडिलांची स्थिती आणि परिस्थिती या माध्यमातून कळते. शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची संधी सहजा-सहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळेचं कारागृह प्रशासनाने गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कारागृहाच्या गळाभेट कार्यक्रमाच्या निमित्ताने बंदीवानांच्या कुटुंबीयांना कारागृहाच्या चार भिंतीआड काय परिस्थिती असते, हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेले आहे. मुलाबाळांसह कुटुंबीय दाखल झाले,त्यामुळे अनेकांना रडू कोसळले तर अनेक महिन्यानंतर बंदिवान पती पत्नीची भेट झाली तर आई- वडिलांना बघून काही बंदिवानांच्या चेहऱ्यावरील आनंद लपवू शकले नाही. ज्यावेळी बंदिवान आणि लहान मुलांची भेट झाली तेव्हाचे भावनिक दृश्य बघून कारागृहातील अधिकारी सुद्धा भावनिक झाले होते.