नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणाने न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, मंत्री छगन भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून देहबोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचे दिसते. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
यासंदर्भात आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा आंदोलक विनोद जगताप यांनी बोलताना सांगितले की, सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध ठिकाणी सभा आंदोलने, मोर्चा हे सुरु आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार देखील सकारात्मक व आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. असे असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्यामधील जामिनावर सुटलेले सरकार मधील मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी व मराठा यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत.
त्यासाठी ते विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत. त्या सभांमध्ये ते एका तरुणाला लाजवेल याप्रमाणे जोरजोरात सलग एक ते दोन तास भाषण देतात. त्यांची देहबोली व जोरजोरात भाषण यावरून ते आजारी असल्याचे कुठेही दिसून येत नाही. मात्र, आजारपणाचे सोंग करुन ते जामीनावर बाहेर आहेत. यातून त्यांनी न्यायालयाची फसवणूक केली आहे. त्यांचा जामीन त्वरित रद्द करुन तुरुंगात पाठवावे. जेणेकरून ते दोन समाजातील तेढ निर्माण करणार नाहीत, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.



