नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांनी केले आहे.
गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हिडिओसह राज्य समितीकडे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पर्यंत mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 2 लाख 50 हजार व तृतीय क्रमांक 1 लाख पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या 3 मंडळे वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रु. व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.