नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
मुंबई/प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी 11 च्या सुमारास कुर्ला पश्चिम परिसरात निळ्या रंगाच्या सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. प्रथमदर्शनी दिसून आलेल्या बाबींवरून मुलीचा खुन करून तीच्या प्रेताची विल्हेवाट लावल्याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी आठ पथक तयार केले. पथकांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली. पोलिसांचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारांमार्फत मयत मुलगी हिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता. मयत मुलगी ही धारावी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत मुलीची ओळख पटल्यानंतर तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारा तिचा प्रियकर त्याच्या मुळगावी ओडिशा याठिकाणी पळून जात असताना ठाणे रेल्वे स्टेशन येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीचे नाव अस्कर मनोज बरला आहे तर आरोपीचा त्याच्या प्रेयसीवर संशय होता. या संशयावरून त्यांच्यात अनेकदा वाद देखील झाला होता. शनिवारी देखील रात्रीच्या वेळी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले. याच रागात मनोजने त्याची प्रेयसी प्रतिमा पवल कीसपट्टा (वय 25) हिचा गळा दाबून खून केला. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत असून त्याच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.