महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर चर्चेची बातमी

अंध विद्यार्थ्यांनी अनुभवला डोळस दिन जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा आदर्श उपक्रम

नेशन न्यूज मराठी टीम.

पालघर/संघर्ष गांगुर्डे- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या निस्पृह कार्याने मी भारावून गेलो आहे जिजाऊ संस्थेचे कार्य महाराष्ट्राला सामाजिक क्षेत्रात दिशा देणारे ठरेल असे प्रतिपादन ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात यांनी केले. झडपोली येथे दोन दिवसीय स्वयं सिद्धता कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिजाऊ भावनादेवी भगवान सांबरे अध्यक्षा , जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची शाळा तसेच अंध शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड ,स्वयंदीप प्रतिष्ठानचे सचिव तसेच जळगाव जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य संदीप पाटील, स्वयंसिद्धताच्या प्रशिक्षक स्वरूपा देशपांडे मंचावर उपस्थित होते.

अंध विद्यार्थ्यांना नेहमीच आधाराची आवश्यकता असते असा सर्वसाधारण समज आहे परंतु अंधांना जर योग्य प्रशिक्षण दिले आणि प्रशिक्षणातून सराव करून घेतला तर अंध व्यक्ती सुद्धा स्वतःला स्वयं सिद्ध करू शकतो याचा अनुभव स्वयंसिद्धता प्रशिक्षणाद्वारे पालघर जिल्ह्यातील अंध व्यक्तींनी नुकताच घेतला.निलेश सांबरे यांनी झडपोली येथे जिजाऊ नगरात जिजाऊ अंध मुला मुलींची शाळेची स्थापना केलेली आहे.या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतात.या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक,सहाय्यक विद्यार्थी आणि तसेच पालघर,वाडा,विक्रमगड,झडपोली या भागातील अंध व्यक्तींसाठी नुकतेच स्वयंसिद्धता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.

भारताचे ब्रेलमॅन म्हणून ओळखले जाणारे, अंध व्यक्तींसाठी निस्वार्थ सेवा करणारे स्वागत थोरात यांनी दोन दिवस या सर्व अंध व्यक्तींना प्रशिक्षण दिले. जिल्ह्यात प्रथमच अंधांसाठी, डोळस कार्यकर्त्यांसाठी आणि शिक्षकांसाठी दोन दिवसीय स्वयंसिध्दता कार्यशाळा संपन्न झाली. निलेश सांबरे यांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच या आयोजनात संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा महिला सक्षमिकरण प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने अंधांसाठी, डोळस कार्यकर्त्यांसाठी आणि शिक्षकांसाठी दिनांक २३ व २४ जून २०२३ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपले आयुष्य सुलभ आणि सुकरतेने जगता यावे यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, लातूर, अकोला, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी व हिंगोली जिल्ह्यांत ५१ आणि मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे अशा आयोजित केलेल्या ५२ स्वयंसिद्धता कार्यशाळा त्यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.याच धर्तीवर पालघर, ठाणे व कोकण विभागातील अनेक अंध व्यक्तींच्या मागणीवरून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पुढाकार घेऊन प्रथमच ही कार्यशाळा पालघर जिल्ह्यातील जिजाऊ नगरी,झडपोली येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेत पांढऱ्या काठीची माहिती व उपयोग, पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव, इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करायचा याबद्दलची माहिती व प्रशिक्षण, स्पर्शज्ञानाने विविध पदार्थ कसे ओळखायचे हे सर्व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकारणही करण्यात आले. अंध प्रशिक्षणार्थींसोबत मतिमंद विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रशिक्षणात सहभाग घेतला पांढऱ्या काठीच्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त सर्वच प्रशिक्षणात मतिमंद विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला तसेच अंध विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सहकार्य देखील केले हे प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य ठरले .हे सर्व प्रशिक्षण स्वतः ब्रेलमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे स्वागत थोरात आणि स्वरूपा देशपांडे यांनी या कार्यशाळेत दिले.अंधांच्या वैयक्तिक जीवनात आमुलाग्र बदल‌ घडवून आणणाऱ्या या स्वयंसिद्धता कार्यशाळेत पालघर व ठाणे व कोकण विभागातील अंधांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×