डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत भाजपने जनआक्रोश मोर्चा काढत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. डोंबिवली शहर भाजपतर्फे पूर्वेतील दत्तनगर चौक ते इंदिरा चौकापर्यंत आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवल्याचा घणाघाती आरोप यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. तसेच एकीकडे सार्वजनिक सेवा सुविधांचा बट्ट्याबोळ झाला असून सार्वजनिक आरोग्य सुविधाही वाईट अवस्थेत आहे, एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वीज बिलांमध्येही भरमसाठ वाढ झाल्याचेही यावेळी भाजपतर्फे सांगण्यात आले. या सर्व मुद्द्यांचा आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले.
वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि दुसरीकडे भरमसाठ वीज बिलाद्वारे नागरिकाची केली जाणारी फसवणूक, वीज माफीचे आश्वासन, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा रुग्णांना न मिळालेला लाभ, मुख्यमंत्री सहायता निधीची न संपलेली प्रतीक्षा, आरोग्य विभाग भरतीत घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक जुन्या इमारतीचा रखडलेला पुर्नविकास, अमृत योजनेचा बट्याबोळ, रखडलेला मलनिस्सारन प्रकल्प, रखडलेली बीएसयुपी योजना, स्मशानभूमीची दुरवस्था, धूर, एमएमआरडीएचे रखडलेले रस्ते, घनकचरा उपविधी कराचा बोजा,ठाकुर्ली पुलाचे रखडलेले काम, रुग्णालयातील डॉक्टराची कमतरता, यासह २७ गावातील पाणी, मालमत्ता कर, कामगाराचा प्रश्न, दुहेरी कर आकारणी वाहतूक कोंडी यासारख्या प्रश्नाचा त्रास नागरिकांना होत असून हे प्रश्न सोडविण्यासाठी वांरवार विनंती करत मोर्चा काढत आणि निवेदने देण्यात आली . मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले .यावेळी बोलताना आमदार चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा अजेंडा मिशन डोंबिवली नसून कमिशन डोंबिवली असल्याचा आरोप केला
या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मंदार हळबे, भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या मनीषा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका कार्यल्यासह प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता