महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

१२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजपकडून निदर्शने

कल्याण/प्रतिनिधी – विधानसभा सभागृहात गोंधळ व तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित केल्या प्रकरणी आज कल्याणमध्ये भाजपकडून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी कल्याण नायब तहसीलदारांना निवेदन दिले.भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नरेंद्र पवार, मांडा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, राजाभाऊ पातकर, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, माजी नगरसेविका वैशाली पाटील, पुष्पा रत्नपारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारची पूर्ण हुकुमशाही सुरु असून राज्यातील सरकारवर कुठल्याही समाजातील नागरिक खुश नाहीये. मागासवर्गीयांचे नोकरीतील अंतर्गत आरक्षण रद्द केलं, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केलं, मराठा समाजाला हे आरक्षण देऊ शकत नाहीत यामुळे सरकारचा सावळा गोंधळ कारभार सुरु आहे. नेत्तृत्वाविना सरकार चालले आहे कि काय अशी शंका सर्व नागरिकांना आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या कमी व्हावी यासाठी हे निलंबन केले असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली.भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द झाले पाहिजे या मागणीसाठी हि निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध प्रश्न घेऊन हे अधिवेशन संपन्न होत होतं, पावसाळी अधिवेशन हे मोठं अधिवेशन असत मात्र दोन दिवसांत हे अधिवेशन सरकारने गुंडाळलं आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न सुरु असतांना गदारोळ झाला. यावेळी उपस्थित नसलेल्या आमदारांचे देखील निलंबन करण्यात आले असून हि सरकारची दडपशाही असल्याची टीका माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×