नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाचा लेट लतीफ कारभाराचा नाहक त्रास कल्याण डोंबिवलकरांना सहन करावा लागत असतो यातून विद्यार्थी वर्ग ही सुटलेला नाही. पालिका शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पालिका शाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून अद्यापही शालेय गणवेश अन्य शालेयपयोगी वस्तूचे वाटप केले नसल्याने जुनेच कपडे घालून विद्यार्थ्याना शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. याकडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले असून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश देण्याची मागणी केली आहे.
केडीएमसीच्या शाळांचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला असताना दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा पेक्षा इंग्रजी माध्यमाकडे पालकवर्गाचा कल वाढत चालल्याने पालिकेच्या प्राथमिक शाळांची संख्या आजमितीला ७६ वरून ५९ वर आली असून त्यात नव्याने २ माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात विविध प्रभागात पालिकेच्या ५९ शाळा प्राथमिक तर २ शाळा माध्यमिक शाळा असून या शाळांमध्ये सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दर वर्षी शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याझाल्या काही दिवसातच पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना गणवेश,पावसाळी रेनकोट, बूट, वह्या मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून पुरविल्या जातात. यंदा शालेय शैक्षणीक वर्षाला सुरवात होऊन दोन महिने झाले तरी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागा कडून गणवेश व इतर शालेय उपयोगी वस्तू अद्याप पर्यत पुरविल्या नसल्याने पालक वर्गाने पालिकेच्या शिक्षण विभागाच्या लेट लतीफ कारभरा बाबत नाराजगी व्यक्त केली आहे.
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यां शाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. आर्थिक दुर्बल घटकातील तसेच वंचित घटकातील विद्यार्थी या आपल्या शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. याकरिता आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे व तातडीने मुलांना गणवेश वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.