नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – विनोदी स्वभाव, सदेतोड उत्तरे देण्याची पद्धत आणि बॉलिवूड मधील कलाकारांशी घेतलेला पंगा यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात अभिजीत बिचुकले हे नाव गाजलं आहे. राजकारण असो वा कलाक्षेत्र बिचुकले हे नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक असो किंवा आमदारकीची, अभिजीत बिचुकले हे निवडणूक लढण्यासाठी नेहमी इच्छुक असतात. आपण सातारा लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण आता बिचुकले कल्याण लोकसभेतून अपक्ष लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कल्याण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कारणे सांगत असताना अभिजीत बिचुकले म्हणाले “कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल त्यात दुमत नाही.” असा टोला त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला. त्याच बरोबर मुख्यमंत्री यांचावरही बिचकुले यांनी टिकास्त्र सोडले ते म्हणाले मुख्यमंत्री हे लोकांना वेगवेगळ्या फक्त भुलथापा देतात. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत. त्यामुळे वैचारिक वारस म्हणून मी कल्याण-डोंबिवली मतदार संघातून निवडणूक लढवत आहे अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली.