नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचा टक्का वाढला आहे. तसेच दुचाकी वापरणाऱ्या नागरिकांना मानेचे कमरेचे विकार देखील वाढत आहेत. याच कारणाने रस्त्यावरील खड्डे हा गंभीर विषय असल्याचे दिसत आहे. शिवाय रात्रीच्या व पहाटेच्या अंधारात बऱ्याचदा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याने महामार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. अशीच एक’ घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स बस पालटल्याने मोठा अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तर आठ जण यात जखमी झाले आहेत.
ट्रॅव्हल्स क्रमांक सी बी 19 – एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तर पन्नासच्या वर भरगच्च प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये भरले असल्याचे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांचे म्हणणे आहे. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहोचली होती. छोट्या आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हल बस वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले आहेत. एसी कोच असलेल्या या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवासी क्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत चालक गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.