नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – वसई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी वीजचोरीच्या गुन्ह्यात न्यायालयील कोठडीत असलेल्या दोन आरोपींना जामिनासाठी वीजचोरीच्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम भरण्याचे आदेश नुकतेच दिले होते. तब्बल आठ दिवसांची पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी व वीजचोरीची २० टक्के म्हणजेच १ कोटी २३ लाख ५४ हजार २६६ रुपयांचा भरणा केल्यानंतरच आरोपींची जामिनावर सुटका होऊ शकली.
वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनीचे (आयेशा कंपाऊंड जवळ, कामनगाव) भागीदार असलेले अब्दुल्ला आमिर हुजेफा आणि शब्बीर आझाद हुजेफा अशी जामिनावर सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने ऑगस्ट २०२१ मध्ये छापा टाकून अमाफ ग्लास टफ या काच बनवणाऱ्या कारखान्याची तब्बल ६ कोटी १७ लाख ७१ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली होती. अटकेतील दोन भागीदारांसह जागा मालक व वीजचोरीत मदत करणारा एकजण अशा चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२१ मध्ये वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील कंपनीचे भागीदार असलेल्या दोघांना १९ एप्रिलला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना सुरुवातीला २४ एप्रिल व त्यानंतर २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने वीजचोरीच्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले. तसेच दर शुक्रवारी वालिव पोलीस ठाण्यात हजेरी, पासपोर्ट जमा करणे, साक्षीदारांवर दबाव टाकणे, वीजचोरीसारखा गुन्हा परत न करणे आदी अटी जामिनासाठी टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोपींनी संबंधित रक्कम भरल्यानंतरच त्यांची जामिनावर सुटका होऊ शकली. तपासी अधिकारी राहुलकुमार पाटील, सरकारी वकील जयप्रकाश पाटील, मूळ फिर्यादी अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे व सहायक विधी अधिकारी राजीव वामन यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे न्यायालयात महावितरणची बाजू भक्कमपणे मांडली गेली.