नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारीपासून ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत ० ते १८ वर्षवयोगटातील सर्व मुले व मुलींची आरोग्य तपासणी करणे, त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये तपासणीअंती आवश्यकता भासल्यास त्या मुलांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
या मोहिमेची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बालविकास व एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाडया, बालगृहे / बालसुधार गृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतीगृहे (मुले/मुली), खाजगी नर्सरी, बालवाडया, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळा बाहय ० ते १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी करावयाची आहे. तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.
सदर अभियानाचे उद्दीष्ट :-
(१) ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
(२) आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
(३) गरजु आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
(४) प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे.
(५) सुरक्षित व सुद्दढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.
सदर अभियानंतर्गत बालकांच्या तपासणी करिता नागरी आरोग्य केंद्र स्तरावर तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे पथक स्थापन करण्यात आले आहे. तपासणी पथकातील प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने दररोज आपल्या कार्यक्षेत्रातील ० ते १८ वर्ष वयोगटातील१५० बालकांची आरोग्य तपासणी करावयाची आहे. त्याकरिता शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाडी यांच्या तपासणीचा कृती आराखडा तयार करून या पथकाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व अंगणवाडीला दररोज (सार्वजनिक सुट्टी दिवस वगळून) भेटी द्याव्यात व प्राथमिक तपासणीतील आवश्यकतेनुसार बालकांना प्रथम, द्वितीय, तृतीय स्तरावर उपचाराकरिता संदर्भित करावे. सर्व स्तर व तपासणी मध्ये उच्चस्तरीय व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर Secondary & Tertiary care services करिता करारबध्द करण्यात आलेली खाजगी रूग्णालये, MJPAY/PMJAY अंतर्गत अंगीकृत रूग्णालये व आरबीएसके अंतर्गत अंगीकृत रूग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत.
या अभियानात नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हदयरोग, क्षयरोग कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सीसह अन्य आजारांची तपासणी व औषधोपचार केले जातील.
तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालकांनी यात सक्रीय सहभाग घेवून आपल्या बालकांची व मुलामुलींची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेमार्फत करण्यात येत आहे.