नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी चा ‘उत्साद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार’ केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातील लोकसंगीत, तमाशा, संगीत वाद्य बनविणाऱ्या कलाकरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वर्ष 2019, 2020 आणि 2021 चे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
येथील मेघदूत सभागृहात 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत अृमत युवा कलोत्सव 2022-23 सुरू आहे. यादरम्यान बुधवारी सायंकाळी ‘उत्साद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव सचिव अनेश राजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी तीन वर्षांसाठी एकूण 102 युवा कलाकारांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
वर्ष 2019 साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे यांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून श्री व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथमआहेत. वर्ष 2021 साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
मूळच्या महाराष्ट्रातील वर्धेच्या गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी या सध्या दिल्लीत स्थायिक असून नाटय क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तीमत्व आहेत.
उत्साद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार संगीत, नृत्य, नाटक, पांरपारिक(लोकसंगीत/आदिवासी/ नृत्य/संगीत/नाटक/ बोलक्या बाहुल्या) या श्रेणीतील युवा कलाकारांना कलेच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. यासह परफॉर्मिंग आर्ट्स सादर करणाऱ्यांना उत्साद बिसमिल्ला खान युवा पुरस्कारातंर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पुरस्कार प्राप्तीचे वय 40 वर्षापर्यंतचे आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.