नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – मुंबईत भारतीय रसायने परिषदेच्या (आयसीसी) पुरस्कार समारंभ आयोजित केला गेला होता. केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी ते सांगत होते कि, भारतीय अर्थव्यवस्थेत रसायने आणि पेट्रोकेमिकल उद्योगाची भूमिका महत्वाची असून, त्याने इतर अनेक क्षेत्रांना देखील विकसित केले आहे. रसायन उद्योगात 80,000 पेक्षा जास्त रासायनिक उत्पादनांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने अधिक चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यवसाय सुलभता आणि रसायने क्षेत्रासाठी पीआयएल यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. देशांतर्गत उत्पादन जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, रासायनिक उत्पादनात जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे उत्पादक घडवण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले की भारताने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) 91% वाढ नोंदवली आहे. यावरून, या क्षेत्राची गुंतवणूक, विकास आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता दिसून येते. रसायन उद्योग सध्या 210 दशलक्ष/अब्ज यूएस डॉलर्सचा आहे आणि 2025 पर्यंत तो 300 चा टप्पा गाठण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय रसायने परिषदेचे अध्यक्ष बिमल गोकुळदास यांनीही पुरस्कार सोहळ्यात आपले विचार मांडले आणि रसायन उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, रसायन उद्योगांविषयीची धारणा बदलण्याची गरज आहे, आणि या उद्योगाच्या महत्वाबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, हे वास्तव रसायन उद्योगाशी संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे. या उद्योगाशिवाय माणसाची एकही गरज पूर्ण झाली नसती आणि इतर उद्योग विकसित झाले नसते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उद्योगातील पद्धती अद्ययावत करण्यासाठी, आयसीसी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासह अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली, आणि या प्रयत्नांचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे नमूद केले.
भारत सरकारच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सहसचिव (रसायने) एस. के. पुरोहित, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय रसायने परिषद आयसीसी पुरस्कार कंपन्यांना प्रदान करण्यात आले, आणि रसायने उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.