नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव येथील ‘एमआयडीसी’ अथर्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे सुरुवातीला थोड्या प्रमाणात लागलेली ही आग हळू-हळू पसरत गेली आणि आगीने काही क्षनातच भयंकर रूप धारण केले. या दरम्यान कंपनीतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. आग मोठी असल्याने नांदुरा, शेगाव, बुलढाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या भयंकर लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मागील पंधरा दिवसात ही दुसरी आगीची घटना आहे. खामगाव अग्निशमन दलाच्या दोनच गाड्या आहेत व त्याही नादुरुस्त आहेत. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण करून मोठे नुकसान केले. याबाबत गेल्या पंधरा वर्षापासून बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनच्या वतीने अग्निशमन दलाची मागणी केली आहे. मात्र, याकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. जर अग्निशमन दलाच्या या गाड्या दुरुस्त असत्या आणि वेळेत पोहोचल्या असत्या तर कंपनीचे नुकसान होण्यापासून वाचले असते. प्रशासनाने या घटनेत रीतसर लक्ष घालणे महत्वाचे आहे. कारण जीवित हानी झाल्यानंतर त्यावर सहानुभूति व्यक्त करण्यापेक्षा अशा घटना पुन्हा होणार नाहीत आणि जरी झाल्या तरी त्यात कमीत-कमी नुकसान होईल यांची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे.