नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता १८ ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातील सत्तर हजार आशांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशन या राज्यव्यापी संघटनेशी संलग्न असलेली ठाणे पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन देखील सहभागी झाली असून आज या आशा सेविकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व आशा सेविका या संघटनेच्या सभासद असुन व त्या गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना भेडसावणा-या समस्यांबाबत संघर्ष करीत आहेत. मागील संप काळात आशांच्या शिष्टमंडळास केडीएमसीमार्फत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या. गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर म्हणून नामोल्लेख करण्यात यावा. आशा सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्रीची सक्ती करू नये. आशा व सुपरवायजर यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. कल्याण डोंबिवली म. न. पा. अंतर्गत कार्यरत असणा-या सर्व आशांना मागील संप काळात ठरल्याप्रमाणे नियुक्तीपत्र मिळाले पाहीजे.
कल्याण डोंबिवली म. न. पा. ने आशांच्या कामाचा वेळ व कामाचा प्रकार ठरवून दिला पाहिजे. सी.एच.ओ. नसलेल्या सब सेंटर मधील आशांना आरोग्य वर्धीनीचा निधी मेडीकल ऑफीसरच्या सहीने देण्यात यावा. शासकीय सुटीच्या दिवशी लाभार्थीची माहीती मागु नये. लाभार्थीची माहीती कामाच्या वेळेतच मानण्यात यावी. इतर वेळी मेसेज किंवा फोन करू नये. डेंगू, क्षयरोग, कुष्टरोग या कामाचे रोज दोनशे रुपये देण्यात यावे.
या मागण्यांचा सहानुभुतीने विचार करून त्या सोडवाव्यात व इतर मागण्या शासन दरबारी मांडून सोडवून घेण्यास मदत करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. या मोर्च्यात निमंत्रक कॉ. सुनिल चव्हाण, कॉ. कविता वरे, कॉ. गीता माने, संगीता प्रजापती, लीला सोनावने, रुद्रा ठोंबरे, इन्तीज शेख, अर्चना जगताप, सुनैना पवार, रेशमा पिंजारी, आशा तुपे आदींसह आशा सेविका मोर्चात सहभागी झाल्या होत्या.