कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप सुरु असून कल्याण-डोंबिवलीमधील आशा कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या विविध मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत, आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
कोरोना काळात आशा कर्मचाऱ्यांचे काम महत्त्वाचे असून, त्यांना याबदल्यात मोबदला मात्र मिळत नाही. तसेच आरोग्यविषयक सुरक्षा देखील त्यांना मिळत नाही. शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन देखील मिळत नसल्याने आपल्या हक्काच्या वेतनासाठी या आशा कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली. कल्याण डोंबिवली परिसरात सुमारे १७५ आशा कर्मचारी काम करत आहेत.
आशा व गटप्रवर्तकांना सरकारी सेवेत कायम करा. सर्व आशांना योग्य नेमणूकपत्रे, आशा डायरी, किट्स मिळाल्या पाहिजेत. कोरोनाचे काम करताना त्यांना पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायजर, केसशिल्ड, हँडग्लोव्हज आदी सुरक्षा साधने पुरवण्यात यावी. अॅटिजन टेस्ट साठी प्रतिदिन ५०० रुपये मोबदला मिळावा. कामावर असताना बरेचदा त्यांच्यावर शाब्दिक, शारीरिक हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. आशा व गटप्रवर्तकांना कोरोनासाठी स्थानिक आस्थापनांनी दरमहा किमान एक हजार रुपये द्यावे.
कोरोनामुळे मृत पावलेल्या आशांना ५० लाखाचे विमा कवच मिळवून द्यावे. आशा, गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना बेड आणि इतर आरोग्यसेवांचा त्वरित आणि मोफत लाभ द्यावा. त्यांना गावोगावी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात इयुटी लावू नये. विनामोबदला कोणतेही काम त्यांच्यावर लादू नये आदी मागण्या यावेळी या महिलांनी केल्या.