नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पुरेसे पाणी उपलब्ध नाही आहे. ऐन उन्हाळ्यात आपली तहान भागवण्यासाठी प्रत्येक जिवाची धडपड सुरू आहे. धुळे शहरातही गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धुळे शहराच्या विविध भागात आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, दरम्यान सध्याच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे आठ ते नऊ दिवसात होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध होत नसून, गढूळ पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. धुळे मनपा उपायुक्त संगीता डहाळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.