नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच त्याच्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक कृत्य म्हणजे, त्याने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट देखील लावली. हा धक्कादायक प्रकार जळगावातील जामनेर तालुक्यातील हरिहर तांडा या गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. सदर दांपत्याला तिसरी सुध्दा मुलगी झाली. जामनेर तालुक्यातील वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात ही प्रसूती झाली. आधीच मुली आणि आपल्याला तिसरे अपत्य मुलगीच जन्माला आल्याने सदर इसमाचा चांगलाच संताप झाला. याच रागातून दुसऱ्या दिवशी गोकूळने त्याच्या जन्मलेल्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू टाकली. त्यानंतर तिला झोळीत झोपवून दिले. या घटनेत चिमुरडीचा मृत्यू झाला. आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असे त्याने कुटुंबियांना भासवत स्वतःच त्या अर्भकावर रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची त्याने विल्हेवाट लावली.