चंद्रपूर/प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रसिद्ध उद्योग बंद पडल्यामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावातील बामणी प्रोटीन्स लिमिटेड या कंपनीवर पर्यावरणवादी राजेश बेले यांच्या तक्रारीवरून उद्योग बंद करण्याची पाळी आली. या कारवाईमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगरांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. हातचे काम गेल्याने आता कुटुंब कसे चालणार? असा प्रश्न कामगारांना भेडसावत आहे.
कामगार युनियन किंवा कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे बामणी प्रोटीन्स व्यवस्थापनाकडून १९ मे २०२४ रोजी टाळे बंदीची कारवाई केली गेली. बल्लारपूर बामणी प्रोटीन उद्योग पूर्णपणे बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय अन्यायकारक असल्याने भारतीय केमिकल वर्कर युनियन यांच्या नेतृत्वात बामणी प्रोटीन कामगार व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. कामगार युनियन यांच्या मते ही कारवाई कामगार कायद्याच्या विरोधात जाऊन करण्यात आली. व्यवस्थापनाने प्रशासनाचा कोणत्याही आदेशाची वाट पाहिली नाही. त्यामुळे हे सगळे बेकायदेशीरपणे करण्यात आले आहे.
बामणी प्रोटीन व्यवस्थापन युनियन सोबत चर्चा करत नाही तसेच उद्योग पूर्वरत सुरु होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे कामगार नेता दिनेश गोंदे यांनी म्हटले आहे. विकास पुरुषांच्या जिल्ह्यात जर सामान्य माणसावर या प्रकारचा अन्याय होत असेल तर कामगारांनी कुणाकडे आशेने बघायचे? असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे. यावर शासनाने आणि राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी कळकळीची विनंती कामगार नेते दिनेश गोंदे यांनी व्यक्त केली आहे.