डोंबिवली/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यास परवानगी दिली.त्यानुसार शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीतील ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी आरती केली गेली.डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, भाऊ चौधरी ,डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे,तात्या माने, राजेश कदम, भैया पाटील, सतीश मोडक ,वैशाली दरेकर ,मंगला सुळे आदींसह शेकडो शिवसैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले व त्यानंतर टाळ वाजवत भक्ती भावाने गणेश पूजन आणि दुर्गा पूजा करत आरती केली.
यानंतर शहर प्रमुख मोरे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंदिर उघडल्या बद्दल हार्दिक अभिनंदन करत असून आता विरोध करणारे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला. आता मंदिर उघडले पण ते कुठे दिसले नाहीत .धार्मिक गोष्टीचे राजकारण करून स्वतःचे स्वार्थ साधून केवळ राजकारण करायचं एवढेच काम विरोधकांना येत असल्याची टीका करत गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देओ ही आमची प्रार्थना असे मोरे यांनी यावेळी सांगितले.