अमरावती/प्रतिनिधी – गेल्या महिनाभरात पाणीटंचाईमुळे राज्यातीला ग्रामीण भागात दुष्काळाची (Drought) स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी (Farmer) वर्गापासून ते वन्यजीवांपर्यंत प्रत्येकालाच पाणीटंचाईची धग बसत आहे. पण आता शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना सुद्धा या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील चपराशीपुरा कमिशनर कॉलनी येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, पाण्याचे चार कोटी रुपयांचे देयक थकल्याने पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले. परंतु, येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा 500 रुपये पाणीपट्टी स्वरूपात कपात होत असतानाही चार कोटी रुपये थकीत कसे? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित होत आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही एका महिन्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांची कुटुंबे पाण्याविना तहानलेली आहेत. शासकीय कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहावेत, यासाठी शहरातील चपराशीपुरा परिसरातील कमिशनर कॉलनी येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वसाहत (Quarter) 1986 मध्ये बांधण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, कृषी विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांतील वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची कुटुंब राहात आहेत. या शासकीय वसाहतीच्या देखभालीचे सर्व कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा इमारत मेंटेनन्स तसेच पाणीपट्टीच्या नावे कपात केली जात आहे. परंतु मागील 35 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स झालेला नसल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत. तर बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचीही देयके भरलेली नाहीत. त्यामुळे जवळपास चार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे अखेर मजीप्राने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच शासकीय वसाहतीमधील पाणीपुरवठा बंद केला आहे.
मागील एक महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात संबंधित बांधकाम विभागाला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयालाही वसाहतीमधील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. महिन्याभरापासून पाणी बंद असल्याने कर्मचारी याच परिसरात असलेल्या एका हातपंपावरून पाणी भरत आहेत. परंतु या हातपंपाला येणारे पाणी गढूळ असल्याने पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वसाहतीसाठी याठिकाणी उभारण्यात आलेली पाण्याची टाकीही जीर्ण झाली आहे. टाकीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या टाकीची स्वच्छताही झाली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.