नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – दहीहंडी उत्सवाच्या परवानगी वरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पडली. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
या चौकात यंदा ही दहीकाला उत्सव साजरा करता यावा यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती.मात्र पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाला ही परवानगी दिली आहे. त्याचा ठाकरे गटाने निषेध करीत पोलीस दबावाखाली काम करत असल्याची टीका ठाकरे गटाने केली.
गेली अनेक वर्ष परंपरेनुसार आम्ही दहीकाला उत्सव साजरा करतो, शिवाय मागील वर्षी जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळेस देखील ठाकरे गटाने दहीहंडी उत्सव साजरा केला होता. आता शिवसैनिकांची बैठक घेऊन या संदर्भात पुढची दिशा ठरवणार असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं. तर पोलिसांनी शिवसेनेला येथे दहीकाला उत्सव साजरा करण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे.
हा उत्सव धार्मिक आहे,कल्याण चे नागरिक ,शिवसैनिक म्हणून दहीहंडी उत्सवात सामील व्हावं, कोणी मालकी हक्क सांगू असं प्रतिउत्तर शिवसेना शिंदे गटाने दिलंय. दरम्यान या दोन्ही गटांच्या वादामुळे इथल्या दहीकाला उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.