नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मध्ये पतंगीच्या माज्यामध्ये अडकलेल्या घुबडाची सुखरूप सुटका करून पक्षी मित्राने घुबडाचा जीव वाचवला आहे. हि घटना कल्याण पश्चिम मध्ये घडली आहे
कल्याण पश्चिमेला दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड आढळून आला पतंगाच्या मांज्यामध्ये तो अडकून पडला होता. सकाळच्या सुमारास गांधारी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एक पक्षी पतंगाच्या मांज्यात अडकल्याचे दिसून आल्याने महापालिका सचिव संजय जाधव यांनी पक्षीमित्र महेश बनकर यांना याबाबत माहिती दिली. महेश बनकर यांनीही मग तातडीने गांधारी परिसरात धाव घेत पतंगाच्या मांज्यात अकडलेल्या या घुबडाची सुटका केली.
हा पक्षी घुबडांच्या प्रजातीतील प्राच्य घुबड (Oriental Scops Owl) असून हा एक दुर्मिळ पक्षी असल्याची माहिती पक्षीमित्र यांनी दिली. बरेच तास मांज्यामध्ये अडकून पडल्याने आणि उन्हामुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असून रात्री त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.
या पक्ष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा पक्षी आकाराने इतर घुबडांपेक्षा काहीसा लहान असून गडद पिवळे डोळे आणि गडद तपकिरी रंगाचे पंख अशी त्याची खासियत आहे. हा पक्षी पूर्व आणि दक्षिण आशियात सर्वाधिक आढळून येतात.
पतंग उडविण्याचा छंद बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या छंदापायी कुणाच्याही जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.