नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. या सापळ्या दरम्यान पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती. हा संशयित चोरटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता, पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्याला अटक केली आहे. चिन्मय तलावडे असे या चोरट्याचं नाव असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी, एक होंडा सिटी कार जप्त केली आहे.
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी पोलिसांना या चोरट्यांचा शोध सुरू केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी कल्याण पूर्व परिसरात सापळा रचला होता. कल्याण पूर्व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी एक दुचाकी चावी लावून उभी केली होती. एक संशय इसम त्या ठिकाणी आला. बाईकला चावी लागलेली पाहताच त्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या पथकाने तात्काळ झडप घालत, या चोरट्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याचे नाव चिन्मय तलावडे असल्याचे समोर आले आहे. चिन्मय हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या, दुचाकी चोरी करायचा. त्याने या आधी देखील अशाच प्रकारे अनेक बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून, कोळशेवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.