नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – नागपूरातील सोलार एक्सप्लोसझिव्ह कंपनीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास स्फोट झाला. ही कंपनी बाजारगाव परिसरात आहे. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लॅंटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याची माहिती समजते. सोलार एक्सप्लोसिव्ह बाजारगाव कंपनीच्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण स्फोटात सोलर कंपनीच्या सीबीएच २ युनिटमध्ये घटना घडली आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
कोळसा खाणीत वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा स्फोट झाला आहे. स्फोटकांचं पॅकेजिंग करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जातेय.२०१८ मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.
जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी कंपनीबाहेर गर्दी केली आहे. कंपनीत किती कामगार काम करत होते, याची माहिती समोर आली नाही. स्फोटाची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढणार असल्यानं कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. मृतामध्ये वर्धा येथील 2, चंद्रपूर येथील एक आणि अमरावती येथील एक जण रहिवाशी आहे. तर पाच जण हे नागपूरमधील रहिवाशी आहेत.