नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावतीचे सुपुत्र बीएसएफ जवान दीपक सुपेकर यांना वीरगती प्राप्त झाली आहे. देशसेवेवर असताना एका चकमकीमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर चंडीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवानाचे पार्थिव आज अमरावतीच्या विलासनगर येथील घरी आणण्यात आले. येथून अंत्ययात्रा काढण्यात आली.
शहीद दीपक सुपेकर अमर रहे, असे घोषणा देत पाणावलेल्या शेकडो डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. अंतिम सलामी देण्यासाठी नागपूर येथील बीएसएफ तुकडी पोहोचली होती. दीपक सुपेकर हे 2009 मध्ये बीएसएफ मध्ये भरती झाले होते. 148 बटालियन चंडीगड येथे ते सध्या कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी तसेच सात व चार वर्षाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या वीरगतीची वार्ता शहरात पोहोचताच सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.