नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असली तरी बारावीच्या निकालामुळे राज्यभर जल्लोषाचे वातावरण आहे. कारण बारावीचा हा निकाल प्रत्येक विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोकण विभाग यंदा प्रथम असून, अमरावती विभाग सहाव्या स्थानी आहे. अशी माहिती अमरावती मंडळाच्या सचिव नीलिमा टाके यांनी दिली. अमरावती विभागामध्ये सर्वाधिक निकाल हा वाशिम जिल्ह्याचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर अकोला, तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ, चौथ्या क्रमांकावर अमरावती आणि पाचव्या क्रमांकावर बुलढाणा जिल्हा आहे.
अमरावती विभागाचा निकाल 93 टक्के लागलेला आहे. यंदाच्या निकालात देखील राज्यात मुलींनी बाजी मारली असतानाच अमरावती मंडळात देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 3.80 टक्क्यांनी वाढले आहे. यंदा सात टक्के विद्यार्थी बारावीत अनुत्तीर्ण झाले. मात्र, या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आगामी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेमध्ये प्रविष्ट व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.