नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – भिवंडीतील सोळा वर्षीय अल्पवयीन संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी ते मलबार हिल राजभवन असा पैदल मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी भिवंडी येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत भोसले या १६ वर्षीय विद्यार्थ्याचे केवळ चालताना धक्का लागला या किरकोळ वादातून दिवसाढवळ्या गुंड टोळीने अपहरण केले. पाच ते सहा तास त्याला अमानुष मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
संकेतच्या खुनामध्ये सहभागी असलेल्या आरोपी व इतर मोकाट फिरत असलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेतले पाहिजे, संकेतच्या मारेकऱ्यांना मोक्का लावला पाहिजे, संकेतच्या मारेकऱ्यांवर पोक्सो व आय.टी.ऍक्ट अंतर्गत वाढीव कलमे त्वरित लावण्यात यावीत, पोलिस स्टेशनला ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, आयोगामार्फत सर्व गुन्हयांची चौकशी झालीच पाहिजे,संकेतच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा पैदल मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांच्या वतीने शासनाकडे निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्च्यात फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व सामाजिक राजकीय, संस्था, संघटना, सामाजिक मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
संकेत भोसलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटना याठिकाणी एकवटल्या आहेत. अनेक महिला देखील सहभागी झाल्या आहेत. याठिकाणी संकेतची आई आणि वडील आलेले आहेत, आम्ही हा पैदल मार्च राजभवनापर्यंत नेणार आहोत, असे भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे म्हणाले आहेत.