कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत लागलेल्या आगीने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. या घटनेत जीवितहानी तसेच आर्थिक नुकसान झाल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने आता डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांच्या “कामा” संघटनेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कल्याण मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यादेखील उपस्थित होत्या. त्यानंतर अंबादास दानवे हे आग दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी एम्स हॉस्पिटलला गेले. यादरम्यान त्यांनी जखमींची विचारपूस केली.
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोट घटनेवर हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर सरकारला तिखट शब्दात टोला लगवला ते म्हणाले “डोंबिवली एमआयडीसीमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून सरकारला याचा जाब विचारला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात डोंबिवली एमआयडीसी मधील 5 धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता. आताच्या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही. या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजेल तसेच सर्व विभागांची चौकशी करावी.” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.