नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
ठाणे/प्रतिनिधी – ड्रेझर’ विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांनी 150 बोटींसह आज खाडीपात्रात उतरुन आंदोलन केले. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशेळी ते गायमुखपर्यंत ३० ते ३५ गावे वसलेली आहेत. १९६० पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपारिक डुबी पद्धतीने रेती काढण्याचा व्यवसाय करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी हा भाग स्थानिकांसाठी राखीव ठेवला आहे. या व्यवसायावर या भागातील भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा २० ते २५ हजार जणांची उपजीविका चालते. जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर या भागातील बेरोजगार, आदिवासी बांधवांची या व्यवसायावर उपजीविका आहे.
मात्र आता ड्रेझर्सला (यांत्रिकी पद्धतीने) रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पट्ट्यामध्ये विकासाच्या नावाखाली आता जल वाहतूक करण्यासाठी ड्रेझर्सने उत्खनन केले जात आहे. यामुळे या भागातील २० ते २५ हजार भूमिपुत्र व कुपोषित भागातील हजारो आदिवासी बांधव बेरोजगार होणार आहेत.या पट्ट्यात शेकडो वर्षांपासून डुबी मारून साधारण ५० पेक्षा अधिक फूट खोल खाडी पात्र झालेले आहे. तसेच याच भागातून २०० ते २५० टनाच्या बार्जेस जात असताना निमित्त साधून खोली करण्याच्या नावाखाली `ड्रेझर’ परवानगी देऊन श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. `ड्रेझर’ ने उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्स वाल्यांकडून २४०० रूपये ब्रासने महसूल खाते खरेदी करून ६६० रूपये ब्रास भावाने बाजारात विकणार आहे. तरी एका ब्रास साठी १७४० रूपये तोटा सरकार सहन करणार आहे. हे कोणासाठी तर श्रीमंतांसाठी सरकार एवढा करोडो रुपयांचा तोटा सहन करणार आहे. यामध्ये मासिक कोट्यवधी रुपये तोटा होणार आहे. तो कोणासाठी ? असा सवाल करण्यात येत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज कशेळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ड्रेझर उभी आहे. त्या ठिकाणी (नागला बंदर खाडी पात्र) घेराव घालून काळे झेंडे दाखविण्यात आले.